राष्ट्रीय अप्रेंटीस योजनेत महाराष्ट्र प्रथम स्थानावर -National Apprenticeship Scheme

National Apprenticeship Scheme राष्ट्रीय शिकावू (अप्रेंटीस) उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल राहिल्याबद्दल केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिनंदन करून महाराष्ट्र दिनाच्याही शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री श्री. चौधरी यांनी मंत्रालयात कौशल्य विकास विभागाला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील कौशल्य विकासाच्या उपक्रमांचा आढावा घेऊन विभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

National Apprenticeship Scheme

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या दालनात झालेल्या बैठकीला कौशल्य विभागाचे आयुक्त नितीन पाटील,व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधुरी सरदेशमुख, रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय शिकावू उमेदवारी प्रोत्साहन योजनेचा सध्या राज्यातील 2 लाख 78 हजार प्रशिक्षणार्थी उमेदवार लाभ घेत असून आय. टी.  आय. मधील तब्बल 52 हजार विद्यार्थ्यांचा या योजनेत समावेश आहे. या योजनेत महाराष्ट्राचे काम चांगले असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री श्री. चौधरी यांनी यावेळी काढले. केंद्रीय मंत्री श्री. चौधरी यांनी राज्यातील कौशल्य आणि रोजगार विषयक विविध धोरणांबाबत राज्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत चर्चा चर्चा केली.

आय. टी.आय मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे, केंद्रीय राष्ट्रीय शिकावू योजना (NAPS) आणि महाराष्ट्राची शिकावू योजना (MAPS) यांच्यात समन्वय साधणारी यंत्रणा विकसित करावी, अशी मागणी  कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केंद्रीय मंत्री श्री. चौधरी यांच्याकडे केली. ग्रामीण अथवा शहरातील झोपडपट्टी परिसरात युवक-युवतींना नव्याने प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी दीड हजार चौरस फुटांच्या जागेमध्ये नवीन कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यासाठी केंद्रीय निकष आहेत. त्या निकषात शिथिलता आणून तीनशे चौरस फुटांच्या जागेत नवीन कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यास  मान्यता द्यावी, राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळ आणि केंद्रीय कामगार विभागांतर्गत असलेले नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलमध्ये समन्वय केल्यास रोजगाराच्या दृष्टीने युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करू शकतो, असे ही श्री. लोढा यांनी यावेळी नमूद केले. राज्याच्या कौशल्य, रोजगार विभागाला केंद्राचे सहकार्य लाभत असून यामागे केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांचे प्रयत्न असल्याचे मंत्री लोढा यांनी आवर्जून सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post